पिंपरी :- श्रावण महिना चालू झाल्यापासूनच बऱ्याच सणांची लगबग चालू होते. नागपंचमी, रक्षाबंधन त्या पाठोपाठ येतात गौरी -गणपती, धार्मिक दृष्ट्या तर या सर्व सणांना महत्त्व आहेच पण तितकेच महत्त्व व्यावसायिक दृष्ट्या देखील आहे. बदलत्या काळानुसार ट्रेंड्सही बदलत आहेत. प्रत्येक वेळी नवीन नवीन फॅशन येत असतात त्या अनुषंगाने काही ट्रेंडिंग व्यवसाय आहेत जे तुम्ही घरबसल्या करू शकता.
1) रेझिन पूजा थाळी व राखी– सध्या रेझिन मटेरियल पासून बनवण्यात येणाऱ्या पूजा थाळी तसेच राखी हा प्रकार फार प्रचलित झाला आहे या प्रकारचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही घरच्या घरी याची ऑर्डर घेऊ शकता व कस्टमरला त्यांच्या आवडीनुसार कस्टमाईज डिझाईन करून देऊ शकता.

2) कस्टमाईज नथ – स्त्री सौंदर्याचा अलंकार म्हणजे नथ सध्या स्त्रियांमध्ये स्वतःच्या किंवा पतीच्या नावाच्या नथी चा ट्रेंड बराच प्रचलित आहे त्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही ती कस्टमाईज पद्धतीने बनवून देऊ शकता तसेच गौरीसाठी देखील ही नथ कामास येऊ शकते.

3) गणपती व गौरीसाठी फेटे– तुम्हाला जर फेटे बांधण्याची कला अवगत असेल किंवा त्या प्रकारचे तुम्ही जर प्रशिक्षण घेतले तर गणपतीसाठी किंवा गौरीसाठी घरबसल्या त्या आकाराचे तसेच वेगळ्यावेगळ्या प्रकारचे फेटे तुम्ही बनवून देऊ शकता. सध्या फेटे या प्रकाराचाही बराच ट्रेंड चालू आहे.

4) फुलांची तोरणे-सणवार आले की ग्रह सजावट ही आलीच, गृह सजावटी मधील एक भाग म्हणजे मुख्य दरवाजावरील तोरण. सध्या वेगवेगळ्या प्रकारांचे फुलांचे तोरण, मण्यांचे तोरण अशा पद्धतीने वेगळे वेगळे प्रकार मार्केटमध्ये पहावयास मिळत आहेत. तुम्ही कच्चामाल आणून घरबसल्या ते तयार करून दिल्यास एक चांगला नाविन्यपूर्ण व्यवसाय होऊ शकतो.

5) शिवलेली नऊवारी साडी- महाराष्ट्राची पारंपरिक पद्धतीची नऊवारी साडी ही प्रत्येकालाच नेसावयास जमते असे नाही त्यामुळे स्त्रियांसाठी किंवा गौरींच्या मापाच्या साडी आणून तुम्हाला जर शिवणकाम येत असेल तर घरबसल्या तुम्ही रेडिमेड नऊवारी शिवू शकता. ज्याप्रमाणे तुम्हाला त्याचा व्यवसाय घरबसल्याही करता येऊ शकतो.

6) बाप्पांसाठी मोदक– सर्वांचे आराध्य असे गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर रोज सकाळी- सायंकाळी अशा दोन वेळच्या आरतीसाठी नैवेद्य म्हणून बाप्पांचे आवडते मोदक बनवावेच लागतात. यामध्ये नवनवीन प्रकार आहेत स्ट्रॉबेरी मोदक, चॉकलेट मोदक, मँगो मोदक, उकडीचे मोदक, तळणीचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचे तुम्ही घरबसल्या बनवून पॅकिंग करून त्याचाही व्यवसाय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो.

7) गौरी साठी फराळ– आज-काल स्त्रियांना त्यांची नोकरी- व्यवसाय पाहून घरातील सर्व सणवार करावे लागतात. या सर्व धावपळीमध्ये सर्वच करणे शक्य होते असे नाही त्यामुळे तुम्ही जर सुगरण असाल तर तुम्ही घरचे घरी फराळ तयार करून गौरी गणपतीसाठी उत्तम पॅकिंग करून तो मार्केटमध्ये देऊ शकता. आजकाल हा व्यवसाय बराच तेजीत आहे.

8) डेकोरेशन सेटअप- महाराष्ट्रात घरोघरी गौरी व गणपतीनचे आगमन होत असते. त्यामुळे दरवर्षी नाविन्यपूर्ण अशी काय सजावट करायची हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो तशा पद्धतीने तुम्ही विचार करून एखाद्या थीमनुसार जर रेडिमेड सेटअप करून त्याचा व्यवसाय केला तर अत्यंत चांगल्या प्रकारे ही कल्पना मार्केटमध्ये चालू शकते.

9) मेकअप हेअर स्टाईल व सारी ड्रेपिंग- सणावारांच्या धामधुमीमध्ये बऱ्याच महिलांना सजण्या सवरण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही मेकअप चांगल्या पद्धतीने करू शकत असाल तर यामध्ये हेअर स्टाईल, सारी ड्रेपिंग, मेकअप तसेच नेल आर्ट अशा वेगवेगळ्या फॅशनची भर पडली आहे या सर्विसेस तुम्ही घरबसल्या देऊन चांगला व्यवसाय करू शकता.

10) रेडीमेड पूजा साहित्य किट– गौरी गणपती अशा सणांमध्ये धार्मिक पद्धतीने केलेल्या शास्त्रानुसार पूजेला व विधीला अत्यंत महत्त्व आहे हे सर्व विधी करायचे म्हणजे आदल्या दिवशी सर्व साहित्याची यादी आठवणीने करावी लागते त्यातली एखादी गोष्ट राहिली तर पूजेच्या ऐनवेळी तारांबळ उडते. त्यामुळे जर तुम्ही पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची यादी करून त्या पद्धतीने जर रेडीमेड पॅकेज तयार केले व कस्टमरला प्रोव्हाइड केले तर लोकांचा वेळही वाचेल व ऐनवेळी तारांबळ ही उडणार नाही अशा पद्धतीने हा एक खूप चांगला व्यवसाय सध्या होऊ शकतो.
(संकलन :- ऐश्वर्या बागल – भडगावकर)